इंडिया आघाडीची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये महाराष्ट्रासारखी राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन हे यांच्याबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांदरम्यान दिल्लीकडे रवाना झाले आहेत. चंपई सोरेन हे भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांच्या सातत्याने संपर्कात असून, सोरेन यांच्यासोबत सहा आमदारही दिल्लीला येत असल्याचा दावा केला जात आहे.
चंपई सोरेन यांच्यासोबत असलेल्या आमदारांशी झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाचा संपर्क प्रस्थापित होत नाही आहे. दरम्यान, हे सर्व आमदार भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झारखंड मुक्ती मोर्चाच्या ज्या आमदारांसोबत संपर्क प्रस्थापित होण्यात अडथळे येत आहेत. त्यांच्यामध्ये दशरथ गगराई, रामदास सोरेन, चमरा लिंडा, लोबिन होमब्रोम, समीर मोहमंती यांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंपई सोरेन काल रात्री कोलकातामधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे त्यांनी भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतली होती. आज पहाटे खासगी कर्मचाऱ्यांसह ते विमानातून रवाना झाले. दरम्यान, ते दिल्लीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिथे ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, चंपई सोरेन हे आसामला जाऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे भाजपाचे झारखंडमधील प्रभारी आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंड झाल्यानंतर ते सहकाऱ्यांसह आसामला गेले होते.
दरम्यान, झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर चंपई सोरेन यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. मात्र हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी चंपई सोरेन यांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घेतले होते. तेव्हापासून चंपई सोरेन नाराज असल्याची चर्चा होती.