जोधपूर: राजस्थानच्या जोधपूरमध्ये रातानाडा येथील एका हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून मॉडेलनं उडी मारली. गुनगुन उपाध्याय असं या मॉडेलचं नाव आहे. गुनगुन रातानाडा येथील हॉटेल लॉर्ड्स इनवर वास्तव्यास होती. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या जीवाला आता धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असणारी गुनगुन शनिवारी उदयपूरहून जोधपूरला आली होती. जोधपूरला आल्यानंतर तिनं तिच्या वडिलांना फोन केला. आपण आत्महत्या करत आहोत. केवळ माझा चेहरा बघून घ्या, असं तिनं वडिलांना सांगितलं. त्यानंतर वडिल गणेश उपाध्याय यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. एसीपी देरावर सिंह यांनी फोन नंबरच्या आधारे गुनगुनचं लोकेशन शोधून काढलं. त्यानंतर पोलीस रातानाडा परिसरातील हॉटेलमध्ये पोहोचले.
पोलीस हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच गुनगुननं सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती. खाली पडताच ती बेशुद्ध पडली. तिला मथुरादास रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गुनगुनच्या छातीला आणि पायाला फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गुनगुनची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
सहाव्या मजल्यावरून उडी मारल्यानं बराच रक्तस्राव झाला. गुनगुनला सातत्यानं रक्त देण्यात येत आहेत. गुनगुनचे वडील जोधपूरमधील व्यवसायिक आहेत. गुनगुनला अद्याप शुद्ध आलेली नाही. त्यामुळे तिनं आत्महत्येसारखं पाऊल का उचललं हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.