मागच्या सव्वा वर्षाच्या काळात कर्नाटकमध्ये घडलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीने खळबळ उडवली आहे. सरकारी कागदपत्रांमधील नोंदीनुसार मागच्या १५ महिन्यांमध्ये कर्नाटकमध्ये ११८२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. भीषण दुष्काळ, पिकांचं नुकसान आणि मोठ्या प्रमाणावरील कर्ज ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागची मुख्य कारणं असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या कागदपत्रांनुसार कर्नाटकमधील बेळगाव, हावेरी आणि धारवाड या तीन जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. या तीन जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे १२२, १२० आणि १०१ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. तर चिकमंगळूरमध्ये ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कलबुर्गी जिल्ह्यात ६९ आणि यादगिरी येथे याच काळात ६८ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.
कर्नाटकमधील २७ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. यामधील केवळ सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्येचे आकडे हे एकेरी संख्येमध्ये आहेत. उर्वरित २१ जिल्ह्यांमध्ये ३०च्यावर शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. चिकबल्लापूर आणि चामराजनगर या दोन जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी दोन शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे.
महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमागे भीषण दुष्काळ, पिकांचं नुकसान आणि मोठ्या प्रमाणावरील कर्जबाजारीपणा या कारणांचा समावेश आहे. तर बिगरशासकीय संघटना आणि संस्थांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये इतरही काही कारणं आहेत.