Bus Accident Video : दिवसेंदिवस अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. लांबच लांब वाहनांच्या रांगा आणि त्यात बसने दिलेली धडक... अंगावर काटा आणणारे दृश्य सर्वांचे लक्ष वेधत आहे. बंगळुरू येथे एक मोठा अपघात होता होता वाचला. तेथील स्थानिक हेब्बल उड्डाणपुलावर मंगळवारी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यादरम्यान बसने अनेक दुचाकीस्वारांना आणि त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या काही चारचाकी वाहनांना धडक दिली. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहता बस चालकाने जाममध्ये अडकलेल्या वाहनांना जाणीवपूर्वक धडक दिल्याचे दिसत नाही. चालकही गोंधळलेल्या अवस्थेत दिसतो.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बसचा वेग खूपच कमी असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर बस चालकाला नक्की चूक कुठे झाली हे समजत नसल्याचे दिसते. इतर वाहनांना धडकल्यानंतर बस जेव्हा थांबते तेव्हा चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती चालकाशी संवाद साधताना दिसतो. घाबरलेल्या अवस्थेतील चालकाचे हावभाव सर्वकाही सांगत आहेत.
सर्वप्रथम बसचा वेग खूप कमी असतो. पण, तितक्यात बससमोर असलेली दुचाकी ट्रॅफिक असल्यामुळे थांबते. मग बस चालकाचे नियंत्रण सुटते आणि बस जवळपास पाच ते सहा वाहनांना जाऊन धडकते. सुदैवाने एक चारचाकी वाहन वाटेत आडवे आल्याने बसला ब्रेक लागतो. दरम्यान, ही घटना बीएमटीसीच्या व्होल्वो बसमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बसमध्ये बसवण्यात आलेल्या दोन कॅमेऱ्यांनी दोन वेगवेगळी दृश्ये रेकॉर्ड केली. पहिल्या कॅमेऱ्यात बसमध्ये बसलेले प्रवासी दिसत आहेत, तर दुसऱ्या क्लिपमध्ये ड्रायव्हर ट्रक चालवताना दिसत आहे.