Cobra In Amazon Package : ऑनलाइन खरेदीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेकदा काही हास्यास्पद घटना समोर आल्या आहेत. कधी समोसा तर कधी दगड अशा भन्नाट वस्तूंनी ग्राहकांच्या संतापाला आमंत्रण दिल्याचे आपण पाहिले आहे. पण, कर्नाटकातील बंगळुरू येथे एका जोडप्याला त्यांच्या ॲमेझॉन पॅकेजमध्ये कोब्रा सापडल्याने एकच खळबळ माजली. हा साप पॅकेजिंग टेपला चिकटलेल्या अवस्थेत होता. माहितीनुसार, संबंधित जोडप्याला त्यांच्या Amazon पॅकेजमध्ये जिवंत कोब्रा सापडला. त्यांनी ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून Xbox कंट्रोलरची ऑर्डर दिली होती, परंतु जेव्हा त्यांना पॅकेज मिळाले तेव्हा ते पाहून धक्का बसला. कारण पार्सल उघडताच त्यामध्ये जिवंत साप होता.
संबंधित जोडप्याने सांगितले की, त्यांनी दोन दिवसांपूर्वी Amazon वरून काही वस्तू मागवल्या होत्या. पण, त्यांना जेव्हा हे पॅकेज मिळाले तेव्हा त्यात जिवंत साप देखील होता. मग डिलिव्हरी बॉयने ते पॅकेज थेट त्यांच्याकडे सोपवले. त्यांनी जेव्हा पार्सल उघडले तेव्हा ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली. याशिवाय त्यांच्यासोबत अनेक लोक होते जे या घटनेचे साक्षीदार झाले.
तसेच आम्हाला आम्ही दिलेले पैसे परत मिळाले आहेत. पण, अत्यंत विषारी सापाने अनेकांचा जीव धोक्यात घालून काय मिळणार आहे? हा ॲमेझॉनचा निष्काळजीपणा आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. हा एकप्रकारे सुरक्षेचा भंग आहे. या गंभीर घटनेची जबाबदारी कोण घेणार? त्यांनी आमचे पैसे परत केले असले तरी कोणतीही भरपाई किंवा अधिकृत माफी मागितलेली नाही, असेही संबधित जोडप्याने सांगितले.
दरम्यान, एका पॅकेजमध्ये साप असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, अर्धे उघडलेले ॲमेझॉन पॅकेज बादलीमध्ये ठेवण्यात आले आहे. पॅकेजिंग टेपमध्ये अडकलेला साप हळूवारपणे हालचाल करत आहे. हे प्रकरण उघडकीस येताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.