कर्नाटकात काँग्रेसमध्ये नाट्य! CM पदावरून पक्षातच शह-काटशाहाचं राजकारण रंगलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 01:40 PM2024-06-28T13:40:53+5:302024-06-28T13:41:27+5:30
कर्नाटकात मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. त्यानंतर आता नेतृत्वबदलावरून पक्षातंर्गत राजकारणाला वेग आला आहे.
बंगळुरू - लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून शह काटशहाचे राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांचे समर्थक उघडपणे नेतृत्व बदलाची भूमिका मांडत आहेत तर सिद्धारमैय्या समर्थकांनी ३ उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला लागू करण्याचा दबाव टाकला आहे. अनेक मंत्री लिंगायत, दलित आणि अल्पसंख्याक उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी मागणी करत आहे. त्यासोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याचीही मागणी करण्यात आली आहे. सध्या हे पद डीके शिवकुमार यांच्याकडे आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर डिके शिवकुमार मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार होते. पक्षात ते संकटमोचक म्हणून पुढे आले होते. केंद्रीय नेतृत्वाचा विश्वासही त्यांच्यावर आहे अशावेळी सिद्धारमैया समर्थकांनी दबावतंत्राचं राजकारण सुरू केले. मात्र या सगळ्या राजकीय चर्चेत डिके शिवकुमार यांनी मौन बाळगलं आहे. कर्नाटकात सत्तानाट्य सुरू झालंय. सिद्धरमैया समर्थक मंत्री केएन राजन्ना, बीडजेड जमीर अहमद खान आणि सतीश जरकीहोली यांनी ३ उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे.
मंत्र्यांनी डिके शिवकुमार यांच्यावर नियंत्रणासाठी ३ उपमुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला समोर आणला आहे. कर्नाटक सरकारला १ वर्ष पूर्ण झालेत. त्यामुळे डिके शिवकुमार यांना CM बनवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. विश्व वोक्कालिगा महास्थानम प्रमुख स्वामी चंद्रेशखर यांनी सिद्धारमैया यांच्याकडे डिके शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देण्याचा सल्ला दिला आहे. कैपा गौडा जयंतीच्या कार्यक्रमात जेव्हा व्यासपीठावर शिवकुमार आणि सिद्धारमैय्या दोघेही उपस्थित होते त्यावेळी हे विधान केले आहे.
दरम्यान, २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभेत काँग्रेस १३५ जागांवर विजयी झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून पक्षात चढाओढ सुरू झाली. सोनिया गांधी यांच्या जवळचे डिके शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. सूत्रांनुसार, हायकमांडनं मध्यस्थी करत अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला समोर आणला होता. त्यानुसार सिद्धरमैया यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. अद्याप सिद्धरमैय्या यांचा १७ महिन्याचा कालावधी शिल्लक आहे मात्र तरीही डिके शिवकुमार यांच्या समर्थकांकडून नेतृत्व बदलाची भूमिका मांडली जात आहे. त्यात सिद्धरमैय्या समर्थकांकडून डिके यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.