श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरातील तीन मुलांच्या आईने दहावीच्या पुरवणी परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवून राज्यातून पहिली येण्याचा मान पटकावला. सबरीना खालिक असे या महिलेचे नाव असून, या यशामुळे त्या विवाहित महिलांसाठी एक प्रेरणास्राेत बनल्या आहेत.सबरीना कुपवाडा जिल्ह्यातील अवूरा या गावच्या रहिवासी आहेत. नववीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लग्नामुळे त्यांना शाळा सोडावी लागली होती. शिक्षण अर्धवट राहिल्याचे त्यांना दु:ख होते. गेल्यावर्षी त्यांनी राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय करीत दहावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून अर्ज केला.
लग्नानंतर मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागली. मी कुटुंब आणि मुलांसाठी पूर्णपणे वाहून घेतले. तथापि, १० वर्षांनंतर गेल्यावर्षी मी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाला कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. परंतु, दैनंदिन घरगुती कामे, मुलांची काळजी घेणे आणि अभ्यास यात समतोल साधताना प्रचंड ओढाताण होत होती. मात्र, माझा निश्चय ठाम होता, असे त्यांनी सांगितले. सबरीना यांना दोन मुली व एक मुलगा आहे.
‘स्वप्नांचा पाठपुरावा सोडू नका’निकाल जाहीर झाल्यानंतर मला खूप आनंद झाला. मी माझे शिक्षण सुरू ठेवू इच्छिते, असे त्या म्हणाल्या. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे थांबवू नका, असा सल्ला त्यांनी विवाहित महिलांना दिला आहे. स्वप्नांचा पाठपुरावा सोडू नका, ती सत्यात उतरविण्यासाठी कठोर परिश्रम करा, असे त्या म्हणाल्या. खालिक यांना ५०० पैकी ४६७ गुण मिळाले. पाच विषयांपैकी गणित, उर्दू, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या चार विषयांत त्यांना ए वन ग्रेड मिळाला.
सासर आणि माहेरची मिळाली साथ
दोन्हीकडील कुटुंबांचा (माहेर व सासर) मला पाठिंबा मिळाला, असे त्या म्हणाल्या. अभ्यासासाठी त्या दररोज काही तासांचा वेळ काढत. माझ्या बहिणी, माझ्या नणंदा व पतीने अभ्यासासाठी मला मदत केली, असे त्यांनी सांगितले. मंगळवारी परीक्षेचा निकाल झाला तेव्हा परिश्रमाचे चीज झाले.