नवी दिल्ली : केदारनाथ येथे दोन तरूण एका खेचराला जबरदस्तीने सिगारेट पाजत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच स्थानिक सोनप्रयाग पोलिसांनी खेचर मालकाला अटक केली. ही घटना छोटी लिंचोलीजवळील थारू कॅम्प येथील असून व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. भारतीय दंड संहिता आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत खेचर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, दोन तरुण खेचराला जबरदस्तीने सिगारेट पाजत आहेत. व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी कारवाईची मागणी केली. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने देखील याला क्रूरता म्हटले. प्राणीप्रेमींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून प्राण्यांवरचे अत्याचार थांबवण्याची मागणी केली आहे.
सिगारेटमध्ये गांजा होता का याची चौकशी केली जाईल - पोलीससोनप्रयाग पोलिसांनी सांगितले की, रुद्रप्रयागमधील पोलिसांनी व्हिडीओ तपासला असून केदारनाथपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटी लिंचोलीजवळ थारू कॅम्पमध्ये ही घटना घडल्याचे आढळले. याप्रकरणी खेचर मालक राकेश सिंह रावत याला अटक करण्यात आली आहे. राकेशविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या सिगारेटमध्ये गांजा भरला होता की नाही, याचा तपास सुरू आहे.