लग्नासाठी प्रियकरानं मागितला लाखोंचा हुंडा; लग्न मोडलं अन् २६ वर्षीय डॉक्टरनं जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 12:15 PM2023-12-07T12:15:17+5:302023-12-07T12:15:45+5:30
मृत तरूणीचे नाव शहाना असून ती तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विभागात पीजीचे शिक्षण घेत होती.
नवी दिल्ली : केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका २६ वर्षीय महिला डॉक्टरने हुंड्याच्या मागणीमुळे आत्महत्या केली आहे. मृत तरूणी ही तिरुवनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजची विद्यार्थीनी होती. तरूणीच्या मृत्यूनंतर केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी महिला व बालविकास विभागाला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मृत तरूणीचे नाव शहाना असून ती तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया विभागात पीजीचे शिक्षण घेत होती. ती कॉलेजजवळील एका घरात भाड्याने राहत होती. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शहानाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न मोडल्याने ती अस्वस्थ होती आणि त्यामुळेच आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कॉलेजमधील डॉक्टरवर शहानाचे प्रेम होते आणि त्याच्याशी तिला लग्न करायचे होते. मात्र, संबंधित डॉक्टर लग्नासाठी हुंड्याची मागणी करत होता.
लग्नास नकार दिल्याने आत्महत्या
माहितीनुसार, लग्न करण्यासाठी डॉक्टर तरूणाने हुंडा म्हणून सोने, जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती. मुलाची ही मागणी पूर्ण करण्यास मुलीचे कुटुंबीय असमर्थ होते. हे कळताच त्याने लग्नाला नकार दिला. लग्न मोडल्यामुळे शहानाला मोठा धक्का बसला अन् तिने टोकाचे पाऊल उचलले. खरं तर तिच्या वडिलांचे देखील काही काळापूर्वी निधन झाले.
...तर मुलाच्या कुटुंबीयांवर कारवाई
दरम्यान, पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा वकील साथी देवी यांनी शहानाच्या आईची त्यांच्या घरी भेट घेतली. शहानाच्या आईने आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी महिला आयोगाने पोलिसांकडून अहवाल मागितला आहे. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा सतीदेवी यांनी सांगितले की, मुलाच्या कुटुंबीयांनी हुंड्याची मागणी केली असेल, तर त्यांच्याविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.