केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात शुक्रवारी एक हैराण करणारा रस्ते अपघात घडला. याठिकाणी एका कार अपघातानंतर एअरबॅग उघडली मात्र त्यामुळे २ वर्षीय चिमुकलीचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. ही मुलगी तिच्या कुटुंबासह कोट्टक्कलहून पदपराम्बू इथं जात होती त्यावेळी हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेबाबत पोलीस तपास सुरू आहे.
कार आणि टँकरमध्ये झाली धडक
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वेगवान कारने टँकरला जोरदार धडक दिली, या धडकेमुळे कारमधील एअरबॅग उघडली तेव्हा आई चिमुरडीला घेऊन पुढच्या सीटवर बसलेली होती. कारच्या धडकेत एअरबॅग उघडली आणि त्या चिमुरडीचा चेहरा एअरबॅगमध्ये दाबला गेला, ज्यात तिला श्वास घेता आला नाही, श्वास गुदमरल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितले. या अपघातात आईसह इतर ४ प्रवाशी किरकोळ जखमी झालेत.
एअरबॅगचा उपयोग कशासाठी होतो?
एअरबॅग सामान्यत: पॉलिएस्टरसारखी मजबूत टेक्सटाइल कपड्याने बनलेला फुगा असतो. याला खास मटेरिअलनं बनवलेले असते, जेणेकरून दुर्घटनेवेळी कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे ठेवता येईल. हे कारमध्ये सेफ्टी कुशनप्रमाणे काम करते. जसं वाहनाला कुणी धडक दिली तर ही सिस्टम सेंशरने तात्काळ एक्टिव्ह होते.
अपघात होताच एसआरएस प्रणालीमध्ये आधीच इन्स्टॉल केलेला नायट्रोजन वायू एअरबॅगमध्ये भरला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया डोळ्यांची पापणी मिटण्याएवढीच म्हणजेच काही मिलिसेकंदात घडते. यानंतर एअरबॅग फुगते आणि प्रवाशांना उत्तम सॉफ्टपणे सुरक्षितता प्रदान केली जाते. एअरबॅगमध्ये छिद्र केले जातात जे गॅस सोडतात. मात्र, वाहनात बसताना सीट बेल्ट लावलाच पाहिजे, असं तज्ज्ञांचे मत आहे. सीट बेल्ट घातल्यावर एअरबॅग उघडल्यावर प्रवाशाला इजा होण्याची शक्यता कमी असते, तर सीट बेल्ट न लावल्यास इजा होण्याची शक्यता जास्त असते.