वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. वायनाड जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेल्या जीपला अपघात झाला अन् नऊ जणांनी आपला जीव गमावला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक महिला असल्याचे सांगितलं जात आहे. वायनाड पोलिसांनी सांगितलं की, केरळच्या वायनाड जिल्ह्यात एका जीपला झालेल्या अपघातात किमान नऊ जण ठार झाले आहेत.
मृतांमध्ये बहुतांश महिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास वल्लाड-मानंथवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. गाडीत १२ जण होते. वायनाड हा काँग्रेस नेते राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला.
या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, खासदार राहुल गांधी म्हणाले की, वायनाडमधील मानंथवाडी येथे झालेल्या जीप दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तातडीने पाऊले उचलण्यास सांगितले आहे. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो.
एका स्थानिक रहिवाशाने मीडियाला सांगितले की, जीप एका खासगी चहाच्या बागेत काम करणाऱ्या महिलांना घेऊन मक्कीमालाला परतत होती. या अपघातात जखमी झालेल्यांना मानंथवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.