पंजाबमधील लुधियाना येथे मोठी दुर्घटना झाली आहे. येथील ग्यासपूर परिसरामध्ये विषारी वायूची गळती झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ११ जण बेशुद्ध पडले आहेत. घटनेची सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच मदत आणि तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे. ग्यायपूरा परिसरामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या आहेत. तसेच रुग्णवाहिकांचीही सोय करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अचानक गॅस लीक झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. हा गॅस जवळच्याच फॅक्टरीमधून लीग झाला, असा दावा स्थानिकांनी केला आहे. या वायुगळतीबाबत माहिती मिळताच लोकांची पळापळ सुरू झाली. तसेच अनेक लोक पळून फॅक्टरीपासून दूर पोहोचले आहेत.
घटनास्थळाजवळ राहणाऱ्या डॉ. शंभुनारायण सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील पाच जण वायुगळती झाल्यानंतर बेशुद्ध पडले आहेत. त्यांना घराच्या जवळ जाऊ दिले जात नाही आहे. आजूबाजूच्या सर्व लोकांवर याचा परिणाण झाला आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या अंजल कुमार यांनी सांगितले की, माझ्या काकांचा इथे आरती क्लीनिक नावाचा शॉप आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडलं आहे. दोन जणांचे मृतदेह अजूनही घरात पडून आहेत. मृतदेह हे पूर्णपणे निळे झाले आहेत.