लुधियाना (पंजाब) : शहराच्या दाट लोकवस्तीच्या गियासपुरा भागात रविवारी विषारी वायूमुळे तीन मुलांसह अकराजणांचा मृत्यू झाला. या भागातील गटारात रसायने टाकल्याने हानिकारक उत्सर्जन झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. गळतीचे स्त्रोत आणि गॅसचा प्रकार अद्याप समजू शकला नसला तरी या भागातील गटारात काही केमिकलची विल्हेवाट लावल्यानंतर आणि मिथेनच्या प्रतिक्रियेतून विषारी वायू बाहेर पडल्याचा संशय आहे.
यामुळे आजारी पडलेल्या चौघांवर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा परिसर सील करण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. गियासपुरा हा स्थलांतरित लोकसंख्या असलेला दाट लोकवस्तीचा परिसर आहे. येथे अनेक औद्योगिक आणि निवासी इमारती आहेत. सर्व पीडित उत्तर प्रदेश आणि बिहारचे असून, ते लुधियाना येथे राहत होते.मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख व आजारी पडलेल्यांना प्रत्येकी ५० हजारांची मदत जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.
न्यूरोटॉक्सिनमुळे मृत्यू झाल्याची शक्यता
लुधियानाच्या उपायुक्त सुरभी मलिक यांनी सांगितले की, आम्ही मॅनहोल्सचे नमुने गोळा करत आहोत. मॅनहोलमधील मिथेनवर काही रसायनांची प्रतिक्रिया झाल्याची शक्यता आहे. n गॅसचा दुर्गंधी पसरू लागल्याने लोक घराच्या बाहेर पडले. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये श्वसनाच्या समस्येची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्या म्हणाल्या की, न्यूरोटॉक्सिनमुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
दुधासाठी गेलेले परतलेच नाहीत
नेमके काय घडले? : रविवारी सकाळी स्थानिक किराणा दुकानात दूध घेण्यासाठी आलेले काही लोक बेशुद्ध पडू लागल्याने ही घटना उघडकीस आली. नंतर विषारी वायूमुळे चारजणांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतरांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दुकानाच्या मालकीच्या कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.