Madhya Pradesh Accident : शनिवार अपघातवार ठरल्याचे चित्र आहे. कारण शनिवारची सकाळ उजाडताच महाराष्ट्रासह देशाला सुन्न करणारी बातमी सर्वांच्या कानावर पडली. एकिकडे नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला, ज्यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, मध्य प्रदेशातील दिंडोरीत देखील बस पलटून झालेल्या अपघातात २४ जण जखमी झाले आहेत.
मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातून शहडोलला जाणारी बस अनूपपूर येथे आज सकाळी पलटल्याने २४ जण जखमी झाले आहेत. या घटनेत जखमी झालेल्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नसून ही घटना कशी घडली याचाही तपास सुरू आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ जणांचा मृत्यूनागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. यानंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपूरहून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवाशी बस पेटली. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.
सरकारकडून आर्थिक मदत जाहीर दरम्यान, या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दुसरीकडे, या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाखांची मदत दिली जाणार आहे आणि जखमींना ५० हजारांची मदत केली गेली आहे.