मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना; नातेवाईकांनी खाटेवर ठेवून सुरू केला 20 किमीचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 01:22 PM2023-01-05T13:22:51+5:302023-01-05T13:27:23+5:30
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सिंगरौली : मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे रूग्णवाहिका नसल्यामुळे एका कुटुंबाला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह खाटेच्या साहाय्याने पायीच गावी न्यावा लागला. नातेवाईकांनी मृतदेह खाटेवर ठेवून गावाकडे जाण्चाचा मार्ग धरला. नातेवाईकांनी 20 किलोमीटरचा प्रवास पायी सुरू केला. मात्र, 5 किमीचा प्रवास झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना मदत केली. अन् पोलिसांनी मृतदेह त्यांच्या घरी वाहनातून नेला.
खाटेवर ठेवून सुरू केला 20 किमीचा प्रवास
खरं तर ही घटना सिंगरौली जिल्ह्यातील सराई तहसीलशी संबंधित आहे. जिल्ह्यातील बेंदो गावात राहणारे 65 वर्षीय मनमोहन सिंग झारा या गावात आपल्या मुलीच्या घरी गेले होते. तिथेच त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या जावयाने मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकेला फोनवरून संपर्क साधला. यावर रुग्णालयाने मृतदेह नेण्यासाठी रूग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने मृताच्या नातेवाईकांनी झारा गावातून मृतदेह नेण्यासाठी खाटेचा आधार घेतला.
दरम्यान, नातेवाईक मृतदेह खाटेवर नेऊन मृतकाच्या गावी बेंदोकडे रवाना झाले. नातेवाईकांनी मृतदेह खाटेला बांधून 20 किलोमीटरचा प्रवास सुरू केला. ते सिधी जिल्ह्यात दाखल होताच जिल्ह्यातील भुईमाड पोलीस ठाण्याच्या जवानांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या. त्यांनी याबाबत स्टेशन प्रभारींना माहिती दिली. अखेर पोलिसांनी मृतदेह आपल्या वाहनात ठेवून संबंधित गावात पोहचवला.
पोलिसांनी केली मदत
भुईमाड स्टेशन प्रभारी आकाश सिंग राजपूत यांनी सांगितले की, मृताच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला होता, परंतु त्यांना रूग्णवाहिका मिळू शकली नाही. यानंतर मृतदेह खाटेवर घेऊन ते पायी चालत मृत व्यक्तीच्या गावाकडे जात होते. आम्हाला संबंधित पोलिसांनी फोनवरून याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस वाहनातून मृतदेह मृताच्या घरी नेण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"