निष्काळजीपणा नडला! १२ वर्षांची मुलगी गाडीत असताना कार कालव्यात कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 03:45 PM2023-08-07T15:45:26+5:302023-08-07T16:19:02+5:30
मध्य प्रदेशातील इंदूर इथे निष्काळजीपणामुळे कार तलावात पडून मोठी दुर्घटना घडली.
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर इथे निष्काळजीपणामुळे कार तलावात पडून मोठी दुर्घटना घडली. एका पर्यटकाची कार कालव्यात पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सिमरोल घाट सेक्शनपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या लुधिया कुंड येथील ही घटना असल्याचे कळते. हा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये १२ वर्षांची मुलगी बसली होती. कार कालव्यात पडत असल्याचे समजताच मुलीच्या वडिलांनी तिच्या बचावासाठी तात्काळ तलावात उडी मारली.
दरम्यान, कार कालव्यात कोसळल्यावर अन्य काही लोकांनी देखील खाली उडी मारली. सुदैवाने मुलीला कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, तिला आणि तिच्या वडिलांनी किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांनाही जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही घटना रविवारी सायंकाळी झाली असल्याचे सांगितले जात आहे. एक कपल आपल्या १२ वर्षाच्या मुलीसह फिरायला गेले होते. तिथे मुलीच्या वडिलांनी हँडब्रेक न लावता गाडी तलावाच्या काठी उभी केली होती. मुलगी गाडीत असतानाच अचानक गाडी खाली कालव्यात कोसळली.
बाप-लेकीवर उपचार सुरू
कार खाली कोसळताच आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी कालव्यात उडी मारली. तेव्हा तिथे अन्य काही लोक देखील उपस्थित होते. त्यातील काही जणांनीही मुलीला आणि तिच्या वडिलांना वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. त्यांनी दोघांनाही बाहेर काढून जवळच्या इस्पितळात दाखल केले.