आईने शाळेत मोबाईल नेण्यास दिला नकार; नववीतील मुलाने केली आत्महत्या, 4 दिवसांनी सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 04:27 PM2022-12-15T16:27:02+5:302022-12-15T16:27:38+5:30
आईने शाळेत मोबाईल नेण्यास नकार दिल्याने नववीतील मुलाने आत्महत्या केली.
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील खरगोन येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे इयत्ता नववीतील मुलाला आईने शाळेत मोबाईल नेण्यास नकार दिल्याने त्याने आत्महत्या केली. खरगोन जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 80 किमी अंतरावर असलेल्या बारवाह पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या भृत्य शर्मा यांचा 13 वर्षांचा मुलगा प्रकाश 4 दिवसांपूर्वी परीक्षेसाठी निघाला होता. मात्र तो वेळेत शाळेत पोहचला नाही आणि 4 दिवस घरीही परतला नाही.
दरम्यान, प्रकाश परीक्षा देण्यासाठी घरातून गेला होता मात्र तो शाळेत पोहचलाच नव्हता. चार दिवसांनंतर त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. प्रकाश याच्या नातेवाईकांना याची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ माजली. पीडब्यूडी विभागात कार्यरत असलेल्या भृत्य शर्मा यांचा मुलगा 4 दिवसांपूर्वी परीक्षेसाठी घरातून निघाला होता. मात्र तेव्हा त्याच्या आईने त्याला मोबाईल नेण्यास विरोध केला. त्यानंतर तो रागात घरातून बाहेर पडला आणि त्याने आत्महत्या केली.
4 दिवसांनी सापडला मृतदेह
आपला मुलगा सापडत नसल्याने प्रकाशच्या वडिलांनी बारवाह पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तब्बल चार दिवसांनी रेल्वे पुलाजवळ मृतदेह आढळून आल्याने नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. प्रकाशचे मामा यांनी मृतदेहाची स्थिती पाहून धास्तीच घेतली. पोलिसांनी प्रकाशच्या वडिलांना बोलावले असता कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. मुलाचा मृतदेह पाहून प्रकाशचे वडील मोठ्याने रडू लागले. "त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पण मोबाईल न दिल्याने एवढी मोठी शिक्षा दिली", असे म्हणत भृत्य शर्मा यांना अश्रू अनावर झाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"