इंफाळ: मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील ड्रग माफियांविरोधात मोहीम राबवणाऱ्या माजी पोलीस अधिकारी थौनाओजम बृंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्याला नशामुक्त, भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या उद्देशानं त्या निवडणूक लढवत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बृंदा यांच्याविरोधात काल प्रचार केला. अमित शाह घरोघरी जाऊन भाजपच्या उमेदवारासाठी मतं मागितली.
चार वर्षांपूर्वी थौनाओजम बृंदा यांचं नाव बरंच चर्चेत होतं. त्यावेळी बृंदा यांनी अनेक ड्रग कार्टेलचा पर्दाफाश केला. यासाठी बृंदा यांचा पोलीस पदकानं सन्मान करण्यात आला. आता बृंदा मणिपूर विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. याइसकुल मतदारसंघातून त्या रिंगणात आहेत. संयुक्त जनता दलानं त्यांना उमेदवारी दिली आहे.
२०२१ मध्ये बृंदा यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदाचा राजीनामा दिला. राज्यातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यासोबतच्या मतभेदानंतर त्यांनी पोलीस दल सोडण्याचा निर्णय घेतला. आता त्या भाजपचे आमदार आणि कायदा मंत्री थोकचोम सत्यब्रत सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
२०१२ बॅचच्या अधिकारी असलेल्या बृंदा यांनी २०१८ मध्ये अनेक मोठ्या कारवाया केल्या. त्यावेळी त्यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणं उघडकीस आणली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या कारवाईत चंदेल स्वायत्त जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष लुखोसी जू आणि सात जणांना अटक झाली होती.