भोपाळ: मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये एक बाप आपल्या मुलाच्या उपचारांसाठी दारोदार भटकत होता. पण कुठूनच सकारात्मक घडत नसल्यानं त्यानं सगळं काही देवावर सोडलं आणि हनुमान मंदिरात मुक्काम ठोकला. एक महिने तो मंदिरात वास्तव्यास होता. हा प्रकार पाहून प्रशासनाला खडबडून जाग आली. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका पाठवली. त्यानंतर मुलाला जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
राजगढच्या खेडी गावात वास्तव्यात असलेल्या बलवंत सोंधिया यांचा १५ वर्षांचा मुलगा प्रेम सागर २ वर्षांपूर्वी एका झाडावरून पडला. त्यामुळे त्याला फ्रॅक्चर झालं. काही दिवसांत हात बरा झाला. पण त्याला एका अज्ञात आजारानं ग्रासलं. त्याच्या उपचारांवर बलवंत यांनी आतापर्यंत १५ लाख रुपये खर्च केले आहेत. कोटा ते झालावाड, इंदूरच्या चोइथराम आणि बॉम्बे रुग्णालयात, इकलेराच्या निरोगधाम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. बलवंत यांनी मुलाच्या उपचारांसाठी जमीनदेखील विकली.
स्थानिक माध्यमांनी आजारी मुलाबद्दलचं वृत्त दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली. जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित यांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी शुक्रवारी मंदिरात पोहोचले. प्रेम सागरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. गरज भासल्यास त्याला भोपाळमध्ये हलवलं जाऊ शकतं.
प्रेम सागरला झालेल्या आजारावर उपचार होऊ शकत नाहीत, असं डॉक्टरांनी सांगितलं. देवच या मुलाला वाचवू शकतो, असं डॉक्टर म्हणाले. त्यानंतर बलवंत मुलाला घेऊन हनुमान मंदिरात पोहोचले. बलवंत यांच्या कुटुंबानं महिन्याभरापूर्वी गाव सोडलं. त्यांनी मांदाखेडा हनुमान मंदिरात मुक्काम केला. आता देवच आमच्यावरचं विघ्न दूर करेल, अशी आशा त्यांना आहे.