narendra modi : माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत हा जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा दावा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केला आहे. "मी देशाला हा विश्वास देऊ शकतो की, तिसऱ्या टर्ममध्ये जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे देखील नाव असेल. पहिल्या तीनमध्ये हिंदुस्थान अभिमानाने उभा असेल. २०२४ मध्ये आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाचा विकास अधिक वेगाने होईल. तसेच तुमची स्वप्ने तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना दिसतील", असेही मोदींनी नमूद केले.
दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात बोलताना पंतप्रधान मोदींनी हे विधान केले. तसेच आमच्या पहिल्या टर्मच्या सुरुवातीला भारत जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होता. तुम्ही मला जेव्हा काम दिले तेव्हा आपण दहाव्या क्रमांकावर होतो. आमच्या दुसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय एजन्सी असेही सांगत आहेत की, भारतातील भीषण गरिबी संपण्याच्या मार्गावर आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.
भारत लोकशाहीची जननी - मोदी पंतप्रधान मोदींनी आणखी सांगितले की, आज संपूर्ण जग स्वीकारत आहे की, भारत लोकशाहीची जननी आहे. आज आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना अमृत महोत्सव साजरा करत आहोत, त्यामुळे हा 'भारत मंडपम' ही आम्हा भारतीयांनी आपल्या लोकशाहीला दिलेली एक सुंदर भेटच आहे. काही आठवड्यांनंतर इथे G-20 शी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातील. जगातील बड्या देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण जगाला भारताची वाढती पावले आणि भारताची वाढती उंची या 'भारत मंडपम'मधून दिसेल.