कर्नाटकातील म्हैसूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पतीने पत्नीला कैद करून ठेवल्याचे उघड होताच एकच खळबळ माजली. पती पत्नीवर अत्याचार करायचा असा आरोप आहे. खरं तर पतीने पीडितेला टॉयलेटमध्येही जाऊ दिले नाही. पतीने तिच्या खोलीत शौचाला जाण्यासाठी एक छोटा बॉक्स ठेवला होता. पण, असे असताना देखील संबंधित महिलेला अजूनही तिच्या पतीसोबत राहायचे आहे. पीडितेने पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. सध्या पोलिसांनी या महिलेची कैदेतून सुटका केली आहे. महिलेचे वय ३० असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित पत्नीला तिच्या पतीने लग्न झाल्यापासून घरात डांबून ठेवल्याचे सांगितले जात आहे. महिलेने दावा केला आहे की, तिचा पती घराला कुलूप लावून कामावर जायचा. पीडितेला दोन मुले आहेत. शाळेतून आल्यानंतर मुले घराबाहेर वडील येण्याची वाट पाहत असायची. पती घरी परतल्यावरच मुलांना घरात प्रवेश मिळत होता. याबाबत परिसरातील कोणीही पतीशी भाष्य देखील करत नव्हते. सुमा आणि सनैया यांचे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
शौचासाठी केला बॉक्सचा वापरपीडित महिलेने सांगितले की, ती आपल्या मुलांना खिडकीतूनच जेवण द्यायची आणि शौचासाठी एका छोट्या बॉक्सचा वापर करायची. कारण या खोलीबाहेर जाण्यावर बंधने होती. ही महिला त्या पुरुषाची तिसरी पत्नी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिला कैदेतून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी महिलेची विचारपूस केली.
तसेच महिलेला तिच्या पतीवर कोणतीही कारवाई करायची नाही किंवा तिने त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला नाही. सध्या ती तिच्या माहेरच्या घरी असून तिच्या वैवाहिक जीवनातील समस्यांवर कुटुंबातील सदस्य एकत्र बसून तोडगा काढणार असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.