नवी दिल्ली - हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये ६ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हिमाचलमध्ये २४ तासांत ३९ ठिकाणी भूस्खलन झाले. बियास नदीच्या प्रवाहामुळे इमारती वाहून गेल्या, पूल कोसळले. यमुनेने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. गेल्या ७२ तासांत देशातील विविध राज्यांमध्ये ७६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये मध्य प्रदेशातील पर्यटकांच्या वाहनांवर दरड कोसळून मध्य प्रदेशातील इंदूरच्या ४ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नदीचे पाणी २०६.३२ मीटरवरून वाहत होते. १९७८ मध्ये यमुनेच्या पाण्याने सर्वोच्च २०७.४९ मीटर पातळी गाठली होती.हिमाचलमध्ये आतापर्यंत आपत्तीत २३ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ४ लोक बेपत्ता आहेत.
मुसळधार पावसाने उत्तर भारतात हाहाकार उडाला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील शामती येथे मंगळवारी दरडी कोसळल्याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. तर उत्तराखंड येथील उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावर संततधारेमुळे दरडी कोसळून त्याखाली वाहने दबली गेली. बचावपथके ती वाहने बाजूला काढताना तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली माणसे तर अडकलेली नाहीत ना याची खातरजमा करत आहेत.