भुवनेश्वर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीच्या घटनेची पुनरावृत्ती ओडिशात झाली आहे. बिजू जनता दलाचे चिल्काचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने गर्दीतील २२ जणांना उडविल्याने एकच खळबळ माजली आहे. जखमींमध्ये सात पोलिसांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान बानापूर येथे बीडीओच्या कार्यालयाबाहेर जमा झालेल्या गर्दीतील लोकांना या कारने उडविले. यात बानापूरच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक आर. आर. साहू यांच्यासह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेत भाजपचे १५ कार्यकर्ते आणि ७ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जखमी झालेेले आमदार जगदेव यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.