नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून ७ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. आघाडी आणि जागावाटपांवर चर्चा सुरू आहे. त्यातच ओडिशात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत भाजपाची बोलणी फिस्कटली आहेत. त्यामुळे आता भाजपा स्वबळावर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा आणि बीजू जनता दल यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरू होती. यात दोन्ही पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढतील असं बोललं जात होते. मात्र त्यातच काही गोष्टींवर बिनसलं आणि भाजपाने ओडिशात स्वबळावर निवडणूक लढणार अशी घोषणा केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी एक्सवर घोषणा केलीय की, मागील १० वर्षापासून नवीन पटनायक यांच्या नेतृत्वात ओडिशात बीजू जनता दल मोदी सरकारच्या अनेक राष्ट्रीय योजनांमध्ये समर्थन देत आली. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. परंतु केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना प्रत्यक्षात जमिनीवर पोहचल्या नाहीत. त्यामुळे ओडिशातील जनता योजनांपासून वंचित राहिली असं त्यांनी सांगितले.
तसेच ओडिशा अस्मिता, गौरव आणि ओडिशातील लोकांच्या हितासाठी आम्ही काम करतोय. ओडिशाच्या विकासासाठी भाजपा यंदा लोकसभेच्या २१ जागा आणि विधानसभेच्या १४७ जागांवर स्वबळाने निवडणूक लढणार आहे असं भाजपाकडून घोषित केले आहे. ओडिशातील जागावाटपात भाजपाला सर्वाधिक जागा हव्या होत्या त्यामुळे दोन्ही पक्षातील बोलणी अयशस्वी ठरली. त्यामुळे आता हे पक्ष एकट्याने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात ४४.८ टक्के मते घेत २१ जागांपैकी २० जागांवर यश मिळवलं होते. तर बीजू जनता दलाने १ जागेवर विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने ८ तर बीजू जनता दलाने ८ जागांवर विजय मिळवला. तर विधानसभा निवडणुकीत बीजू जनता दलाने ११२ आणि भाजपाने २३ जागांवर विजय मिळवला होता.