भुवनेश्वर : मतदारसंघातील काही लोकांनी आपल्याला दोन तास ओलीस ठेवले होते, असा आरोप ज्येष्ठ भाजप नेत्या, भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी केला आहे. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत सारंगी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पत्र पाठवून दौऱ्यांदरम्यान त्यांच्या सुरक्षेबाबत दाखविण्यात येत असलेल्या कथित उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सारंगी यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘मी सोमवारी संध्याकाळी प्रभाग क्रमांक ४३ मधील रहिवाशांच्या निमंत्रणावरून बैठकीत भाग घेण्यासाठी जात होते. तेव्हा लक्ष्मीसागर भागातील समाजकंटकांनी गाडी अडवून बैठकीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. मी पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणेपर्यंत दोन तास कारमध्ये बसून होते. यावरून राज्य सरकारचा दुर्भावनापूर्ण हेतू दिसून येतो, असे सांगत माझ्या वाया गेलेल्या वेळेची भरपाई राज्य सरकार कशी करणार, असा सवालही त्यांनी केला.