odisha train accident : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वेअपघातात आतापर्यंत २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अद्याप ८३ मृतदेहांची ओळख पटलेली नाही. दरम्यान, सरकारने आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला. भरपाई मिळवण्यासाठी एका महिलेने या रेल्वेअपघातात आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दाखवून तो आपला पती असल्याचे तिने सांगितले. मात्र, कागदपत्रांच्या तपासणीत महिलेचे खोटे पकडले गेले. हा प्रकार पतीला समजताच त्याने गुन्हा दाखल केला. तर अटकेच्या भीतीने महिला फरार आहे.
कटक जिल्ह्यातील महिलाओडिशातील कटक जिल्ह्यातील मणिबांदा येथील ही महिला असून गीतांजली दत्ता असे तिचे नाव आहे. तिने दावा केला होता की, २ जून रोजी तिचा पती विजय दत्ता याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मग तिने अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दाखवून तो आपला पती असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिच्याकडे कागदपत्रे मागितली असता तिचे खोटे पकडले गेले. खरं तर पोलिसांनी तिला इशारा देऊन सोडून दिले. पण ही बाब तिच्या पतीला कळताच त्याने मणिबंध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
१३ वर्षांपासून पतीपासून वेगळी राहते महिलाआरोपी महिलेचा पती विजयने सांगितले की, खोटी माहिती देऊन आणि त्याच्या मृत्यूचे खोटे सांगून नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गीतांजलीवर कठोर कारवाई करावी. लक्षणीय बाब म्हणजे हे जोडपे मागील १३ वर्षांपासून वेगळे राहत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. दुसरीकडे, रेल्वे मंत्रालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
२८८ जण दगावले२ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २८८ जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.