श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मागील अनेक महिन्यापासून सुरू ठेवलेल्या Operation All Out मुळे दहशतवादी कारवायांना मोठा चाप बसला. त्यामुळे दहशतवादी चवताळले आहेत. या ऑपरेशनमुळे दहशतवाद्यांचे कंबरडं मोडलं आहे. आता याबाबत एका हिंदी वृत्तवाहिनीने महत्त्वपूर्ण माहिती पुढे आणली आहे. गुप्तचर यंत्रणाच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये 'ऑपरेशन ऑल आऊट' राबवले. या कारवाईच्या माध्यमातून सैन्याने दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. आता दहशतवादी पुन्हा हल्ला करण्याची योजना आखत आहेत. लश्कर-ए-तोयबा (एलईटी) ही दहशतवादी संघटना याबाबत एक मोठा कट रचत आहे. लष्कराचे ५ दहशतवादी काश्मीरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दहशतवादी सध्या पीओकेमध्ये
सध्याच्या परिस्थितीत गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. एका कमांडरसह लष्कराचे ५ दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचे अलर्टमध्ये खुलासा केला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाच दहशतवादी सध्या पाकव्याप्त काश्मीर (पीओके) येथील कचरबन गावात लष्कराच्या लॉन्चिंग पॅडवर हजर असून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर यंत्रणांनी हे इनपुट सर्व एजन्सींना शेअर करून सतर्क राहण्यास सांगितले आहे. नुकतेच गृह मंत्रालयाने लष्कर प्रमुख हाफिज सईदचा मुलगा हाफिज तलहा सईद याला UAPA अंतर्गत कुख्यात दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
श्रीनगरमध्ये प्रवासी वाहनात स्फोट
अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये प्रवासी वाहनात स्फोट झाला आहे. हा स्फोट ट्युलिप गार्डनजवळ झाला. ज्या भागात ही घटना घडली, त्या भागात खूप गर्दी होती. या स्फोटात बस चालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सिलिंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होतं. मात्र, दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) स्वत: या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ही संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. सोशल मीडिया पोस्टनुसार, द रेझिस्टन्स फ्रंटने सांगितले की, हल्ल्यात मॅग्नेटिक आयईडीचा वापर करण्यात आला होता.