लोकमत न्यूज नेटवर्कचंदीगड : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी पक्षांतरांचा (आयराम-गयाराम) खेळी खेळली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ जानेवारीपासून सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ फेब्रुवारी आहे.
दरम्यान, राजपुरामधून उमेदवारी मिळविण्यासाठी काही दिवसांपूर्वी लोक भलाई ट्रस्टचे प्रमुख जगदीश जग्गा हे पंजाब लोक काँग्रेसमध्ये सामील झाले होते. ते आता भाजपमध्ये सामील झाले आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांनी त्यांना पक्षात सामील करून घेतले आहे. जग्गा यांना राजपुरामधून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे.
याआधी ते काँग्रेसकडून नशीब अजमावणार होते. परंतु, काँग्रेसने विद्यमान आमदार हरदयाल कंबोज यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने, त्यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केली.तीनवेळा आमदार राहिलेले आणि चौदा वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेले रणजित सिंग छज्जलवड्डी हेही अकाली दलात सामील झाले असून, पक्षाध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी त्यांचे पुत्र सतिंदरजित सिंग यांना जंडियाला गुरु मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जारी झाल्यानंतर चार जागांसाठी बंडखोरी होण्याची शक्यता बळावली आहे.