रायपूर अधिवेशनात परंपरा बाजूला ठेवत काँग्रेसच्या घटनेत होणार दुरुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 11:26 AM2023-02-19T11:26:45+5:302023-02-19T11:27:20+5:30
सोनिया गांधी व मनमोहन सिंह यांना कार्यकारिणीचे आजीवन सदस्यत्व
आदेश रावल
नवी दिल्ली : रायपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनात पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात येणार आहे. याद्वारे माजी अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना काँग्रेस कार्यकारिणीचे आजीवन स्थायी सदस्यत्व देण्यात येणार आहे.
अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सल्ला दिला आहे की, माजी पंतप्रधान व माजी पक्षाध्यक्षांना कार्यकारिणीचे स्थायी सदस्यत्व देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी. परंतु राहुल गांधी यांना स्वत:ला दुरुस्तीद्वारे स्थायी सदस्यत्व नको आहे. त्यामुळे दुरुस्तीद्वारे सोनिया गांधी व मनमोहन सिंह यांना कार्यकारिणीचे स्थायी सदस्य केले जाईल. उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक लढवू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, कार्यकारिणीची निवडणूक लढल्यास त्या सरचिटणीस म्हणून कार्यकारिणीत मनोनित होतील. गांधी कुटुंबातील दोन सदस्य कार्यकारिणीची निवडणूक लढवणार नाहीत. तथापि, काँग्रेसमधील परिपाठानुसार माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधान आजवर कार्यकारिणीवर मनोनित होत आलेले आहेत. ही परंपरा आहे. परंतु पक्षाच्या संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे परंपरा बाजूला ठेवत काँग्रेस संविधानात दुरुस्ती करणार आहे.