भरतपूर: राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात एक हदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शाळा सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. कडुलिंबाच्या झाडाला स्पर्श करताच विद्यार्थ्याचा जीव गेला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली आहे. कैथवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या इकलेरा गावात हा प्रकार घडला.
इकलेरा गावात वास्तव्यास असलेला अंशू राजकीय विद्यालयाचा विद्यार्थी होता. शुक्ववारी तो वेळेआधी शाळेत पोहोचला. शाळेचा दरवाजा उघडलेला नाही हे पाहून तो कडुलिंबाच्या झाडाखाली जाऊन वाट पाहू लागला. या झाडावरून ११ किलोव्हॅटची लाईन जाते. त्याची तार नीट नव्हती. त्यामुळे झाडात करंट जात होता. त्यामुळे अंशूनं झाडाला हात लावताच त्याला जोरदार झटका बसला. विजेचा धक्का लागताच अंशू बेशुद्ध होऊन पडला. जागीच त्याचा मृत्यू झाला.
अंशूला विजेचा धक्का बसताना आसपासच्या लोकांनी पाहिलं. त्यांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर या घटनेची माहिती अंशूच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांनी तातडीनं रुग्णालय गाठलं. अंशूच्या मृत्यूसाठी वीज विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी कैथवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.