राजस्थानमध्ये काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, दहा दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या उमेदवारालाच केलं पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 01:03 PM2024-01-08T13:03:24+5:302024-01-08T13:04:49+5:30
Karanpur Assembly By Election: राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला महिनाभरातच मोठा धक्का बसला आहे. एका उमेदवाराच्या निधनामुळे निवडणूक न झालेल्या करणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. दरम्यान, राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला महिनाभरातच मोठा धक्का बसला आहे. एका उमेदवाराच्या निधनामुळे निवडणूक न झालेल्या करणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. अवघ्या दहा दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना भाजपाने या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र टीटी यांना काँग्रेसचे उमेदवार रूपिंदर सिंह कुनुर यांनी १२ हजार ५७० मतांनी पराभूत केले आहे.
या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुनूर यांचं निधन झाल्याने करणपूर येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राजस्थानमध्ये १९९ जागांसाठीच मतदान झालं होतं. तर करणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतंच मतदान झालं होतं. त्यात मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला आहे.
सुरेंद्र पाल सिंह टीटी यांनी दहा दिवसांपूर्वीच राजस्थान सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तसेच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्यांच्या सरकारमध्ये सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आले होते. मात्र आजच्या पराभवामुळे त्यांचं मंत्रिपद औटघटकेचं ठरलं आहे.
दरम्यान, या मतदारसंघातील संपूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसचे उमेदवार रूपिंदर सिंह कुनूर यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना सांगितले की, श्रीकरणपूर मतदारसंघातील विजयी उमेदवार रूपिंदर सिंह कुनूर यांचं अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा. हा विजय दिवंगत गुरमित सिंह कुन्नूर यांना समर्पित आहे. श्रीकरणपूर येथील जनतेने भाजपाच्या अहंकाराला पराभूत केले आहे.