राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला होऊ शकतो दोन जागांचा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:36 AM2022-05-24T07:36:34+5:302022-05-24T07:36:57+5:30
११ जागा मिळण्याची आशा : संख्याबळ २९ वरून ३२ वर जाणार
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला एका जागेचा फायदा होऊ शकतो. मात्र काँग्रेसला दोन जास्तीच्या जागा मिळू शकतात. काँग्रेसचे ८ खासदार निवृत्त होत आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एक तर, कर्नाटकातील दोन सदस्य निवृत्त होत आहेत.
काँग्रेस स्वबळावर ९ जागा जिंकेल, तर, झारखंड आणि तामिळनाडूतून सहकारी पक्षाकडून दोन अतिरिक्त जागा मिळू शकतात. काँग्रेसला जर दोन अतिरिक्त जागा मिळाल्या तर, राज्यसभेतील त्यांची संख्या २९ वरून ३२ वर पोहोचू शकते. पक्षाचे नेते कपिल सिब्बल, जयराम रमेश, पी. चिदंबरम आणि आनंद शर्मा हे निवृत्त होत आहेत आणि त्यांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय रणदीप सुरजेवाला, अविनाश पांडे, अजय माकन, मुकुल वासनिक आणि गुलाम नबी आझाद यांनाही राज्यसभेत जाण्याची अपेक्षा आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आगामी काही दिवसात उमेदवारांबाबत निर्णय घेऊ शकतात. ३१ मे ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.