राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरीला उत आला आहे. काँग्रेसने रामगड विधानसभा मतदारसंघामध्ये सफिया खान यांच्या जागी पती जुबेर खान यांना तिकीट दिले आहे. मात्र आपल्याऐवजी पतीला तिकीट दिल्याने आमदार असलेल्या सफिया खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पक्षाने हे योग्य केले नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना अंतर्गत कलहाचा सामना करावा लागत आहे. भाजपाने आतापर्यंत १२४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र ही यादी जाहीर होताच भाजपामध्येही विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. अलवरमधील थानागाजी विधानसभा मतदारसंघातून हेमसिंह भडाना यांना उमेदवारी दिली आहे. याच्या विरोधामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आपल्याच उमेदवाराचा पुतळा पेटवला.
तर काँग्रेसने अलवरमधील रामगड विधानसभा मतदारसंघातून सफिया खान यांचं तिकिट कापत त्यांचे पती जुबेर खान यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आपलं तिकीट कापलं गेल्याने सफिया खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सफिया खान प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, पक्षानं हे चांगलं केलेलं नाही. मात्र या प्रकरणी आतापर्यंत जुबेर खान यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. जुबेर खान हे प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. रामगड सीट ही मेवात क्षेत्रामध्ये येते. भाजपाकडून येथे ज्ञानदेव आहुजा यांनी दीर्घकाळापर्यंत विजय मिळवत होते. मात्र २०१८ मध्ये आहुजा यांचं तिकिट कापून भाजपाने सुखवंत सिंह यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी काँग्रेसच्या सफिया खान यांनी बाजी मारली. आता भाजपा रामगड येथून कुणाला उमेदवारी देते हे पाहावे लागेल.