राजधानी नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे भाजपाचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांना पक्ष कार्यकर्त्यांना पुढील 100 दिवस उत्साहाने काम करण्याचे आवाहनही केले. या राष्ट्रीय अधिवेशनात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपा लोकसभेची निवडणूक आता जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखालीच लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवले होते. त्यानंतर जे. पी. नड्डा यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.