नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील नैतिकता समितीचा अहवाल काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी फोडला, असा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. या अहवालात काय आहे याची आपल्याला कल्पना नसल्याचेही ते म्हणाले. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा मोईत्रा यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी नैतिकता समितीने चौकशी करून अहवाल तयार केला आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणीमहाराष्ट्र आणि पंजाबमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी सोमवारी लोकसभेत करण्यात आली. सभागृहात शून्य तासात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे जसबीर सिंग गिल यांनी अनुक्रमे महाराष्ट्र आणि पंजाबमधील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचा मुद्दा उपस्थित केला आणि केंद्राकडे कर्जमाफीची मागणी केली.
‘आप’चे राघव चढ्ढा यांचे निलंबन अखेर मागेराज्यसभेने सोमवारी आम आदमी पक्षाचे सदस्य राघव चढ्ढा यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी दिली. पावसाळी अधिवेशनात ११ ऑगस्टला चढ्ढा यांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले होते. चढ्ढा यांनी नंतर निलंबन रद्द केल्याबद्दल सभापती आणि न्यायालयाचे आभार व्यक्त करणारा व्हिडिओ संदेश जारी केला.