- सुनील चावकेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पलटविणारा मोदी सरकारचा वटहुकूम राज्यसभेत पराभूत करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विविध राजकीय पक्षप्रमुखांच्या भेटी घेण्यासाठी ‘देशाटना’ला निघाले आहेत; पण ही मोहीम फत्ते झाली तरी त्यांना दिल्लीत परत आल्यानंतर काँग्रेसपुढे नमते घेण्यावाचून पर्याय नाही.
भाजपची तथाकथित ‘बी’ टीम बनून विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’नेकाँग्रेसच्या मतविभाजनात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या ११ वर्षांत काँग्रेससह भाजपविरोधी पक्षांना केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत हिणवले; पण काळाच्या ओघात ‘आप’ची राजकीय कोंडी झाली आहे.
चोहोबाजूंनी अडकलेल्या ‘आप’चे गर्वाचे घर खाली करण्यासाठी हीच संधी असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. केजरीवाल यांनी कितीही जंगजंग पछाडले तरी राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष काँग्रेसने विरोधात मतदान केल्याशिवाय मोदी सरकारचा वटहुकूम पराभूत होऊ शकणार नाही. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ‘आप’चा फटका बसणार नाही, याची केजरीवाल यांच्याकडून हमी मिळाल्याशिवाय काँग्रेस वटहुकुमाविरोधात मतदान करणार नाही.
कुणाला भेटणार?केजरीवाल बुधवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि त्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेणार आहेत.
काँग्रेसमध्ये २ मतप्रवाहआपला पाठिंब्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काँग्रेसच्या दिल्ली व पंजाबमधील नेत्यांनी राज्यसभेत अध्यादेशाच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांना पाठिंबा देऊ नये, असे आवाहन केले आहे. केजरीवाल यांच्याशी भविष्यात कोणत्याही प्रकारचा समझोता करण्यास विरोध केला आहे. आता याबाबत काँग्रेस श्रेष्ठींना निर्णय घ्यायचा आहे. या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसने केजरीवाल यांना पाठिंबा दिला नाही, तर विरोधकांच्या ऐक्याला धक्का बसणार आहे.
मनीष सिसोदियांची पोलिसांनी धरली गचांडीदिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मंगळवारी राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करताना दिल्ली पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांनी केला.