डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदाबाद :गुजरात हायकोर्टात एका खटल्यासंदर्भात असहमतीवरून खुल्या कोर्टात दोन न्यायाधीशांमध्ये जोरदार वादावादी झाली. २३ ऑक्टोबर रोजी सोमवारी न्यायमूर्ती बिरेन वैष्णव आणि मौना भट्ट एका प्रकरणाची सुनावणी करत होते. न्यायमूर्ती वैष्णव याप्रकरणी आदेश देत असताना न्यायमूर्ती भट्ट या वैष्णव यांच्या कानात कुजबुजल्या. न्यायमूर्ती वैष्णव यांच्या आदेशाशी त्या सहमत नव्हत्या. भट्ट यांच्या कुजबुजीनंतर न्यायमूर्ती वैष्णव यांनी संतापत त्यांना ‘वेगळा आदेश’ देण्यास सांगितले.
‘तुम्ही असहमत आहात… यापूर्वीही तुम्ही एका मुद्यावर वेगळा आदेश दिलाच आहे. इथेही वेगळा आदेश द्या’, असे वैष्णव म्हणाले. यावर मौना भट्ट म्हणाल्या की, ‘ही असहमतीची बाब नाही...’, मात्र वैष्णव ‘तुम्ही वेगळा आदेश द्या. उगीच कुरकुर करू नका’, असे म्हणाले. त्यानंतर न्यायमूर्ती वैष्णव ताडकन उठले आणि खंडपीठ पुढील कोणत्याही प्रकरणाची सुनावणी करणार नसल्याचे सांगत न्यायदान कक्षातून निघून गेले. तेव्हापासून न्यायमूर्ती वैष्णव हे न्यायमूर्ती भट्ट यांच्यासोबत खंडपीठात बसलेले नाहीत.
थेट प्रक्षेपण झाले, पण...
गुजरातउच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनलवर सर्व खंडपीठांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण होते. या वादावादीनंतर लगेचच या खंडपीठाचा व्हिडीओ यूट्यूबवरून काढून टाकण्यात आला.
यापूर्वीही घडला प्रकार
जानेवारी २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात अशीच एक घटना घडली होती. न्यायमूर्ती एम.वाय. इकबाल आणि अरुण मिश्रा यांच्यात एक प्रकरण दाखल करण्यावरून न्यायदान कक्षातच जोरदार वाद झाला होता.