नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील मुंडका इमारतीमध्ये आग लागल्याने झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इमारतीमधून 26 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तिसऱ्या मजल्यावरील परिस्थिती जाणून घेणं बाकी आहे. अद्यापही इमारतीमध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, इमारतीमधील जखमी झालेल्या 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंडका परिसरातील इमारतीत लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केल्याने या दुर्घटनेत अद्यापपर्यंत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सायंकाळी 4.45 च्या सुमारास ही आगीची घटना घडल्यासंदर्भात मुंडका पोलीस ठाण्याला एक फोन आला होता. त्यानंतर, स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, प्रशासनालाही मदतीला बोलावले. तेव्हापासून मदतकार्य सुरू असून आत्तापर्यंत 16 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इमारतीमधील फ्लॅटची खिडकी तोडून अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.
राजधानी दिल्लीतील तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. या घटनेनं देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे.