नवी दिल्ली : झारखंडमधील रांची येथून अत्यंत निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. रांचीच्या RIMS च्या बालरोग विभागात डॉक्टरांचा घोर निष्काळजीपणा उघड झाल्यानंतर यावर संताप व्यक्त केला जात आहे. खरं तर इथे रुग्णालयात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला होता. मात्र मुलाचा मृतदेह तब्बल चार तास बेडवर पडून होता. याकडे डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, मृतदेह ज्या बेडवर पडून होता, त्याच बेडवर दुसऱ्या मुलावर उपचार सुरू करण्यात आले होते. या मृतदेहाची बातमी पसरताच कर्मचाऱ्यांनी आपली चूक लपवण्यासाठी घाईघाईने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आणि त्यांना निघून जाण्यास सांगितले. आता याप्रकरणी वाद चिघळला आहे. खरं तर बिहारमधील गया येथील रहिवासी असलेल्या १२ वर्षीय आदित्यला किडनीच्या समस्येमुळे रिम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आदित्यचे काका रिंटू पटेल म्हणाले की, आम्ही त्याला शनिवारी पहाटे ४ वाजता इथे घेऊन आलो होतो. त्याला येथे आणल्यानंतर डॉक्टरांनी डायलिसिस करण्यास सांगितले. तसेच RIMS मध्ये डायलिसिस व्हायला वेळ लागेल, त्यामुळे खासगी रूग्णालयात जाऊन डायलिसिस करून घ्या, असेही त्यांनी सांगितले.
डॉक्टरांचा निष्काळजीपणा सांगताना मृत मुलाचे काका म्हणाले, "डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही स्ट्रेचरवर पडलेल्या आदित्यला लिफ्टमधून तळमजल्यावर आणले होते. तळमजल्यावर आणल्यानंतर त्याच्यावर बालरोग वॉर्डमध्ये काही चाचण्या होणार होत्या. इकडे आणून आम्ही आदित्यला बेडवर झोपवले. त्यानंतर डॉक्टरांनी आदित्यचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नंतर त्याचा मृतदेह बेडवर ठेवला. त्यानंतर आम्ही पेपरवर्क करू लागलो." तर बालरोग विभागात बेडची कमतरता असल्याने डेंग्यूने त्रस्त असलेल्या साडेचार वर्षाच्या बालकालाही याच बेडवर झोपवून उपचार सुरू केले, असे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
लिफ्टबाहेर पेशंटचा मृत्यू झाला - PROआदित्यचा मृतदेह योग्य ठिकाणी न ठेवण्याबाबत RIMS PRO यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाला होता. आतमध्ये त्याचा मृत्यू झाला नव्हता तरीही आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.
आदित्यचा लिफ्टमध्येच मृत्यू झालातसेच आदित्यच्या मृत्यूवर काका चिंटू म्हणाले की, आम्ही त्याला डायलिसिससाठी खासगी रुग्णालयात घेऊन जात होतो. मात्र लिफ्टमधून खाली उतरताना त्याला जोरदार झटका आला होता. तेव्हा कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा. पण आम्हाला काही कळतही नव्हते. त्यामुळे तब्बल चार तासांनंतर त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"