नवी दिल्ली - देशाच्या पुढील राष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा तसेच विरोधी पक्षांकडून उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान, भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी देण्यात येणाऱ्या उमेदवाराविरोधात सर्वसहमतीने उमेदवार देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांनी दिल्लीमध्ये बैठक बोलावली आहे. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षांमध्ये एकमत करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मात्र या संपूर्ण निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या जय-पराजयाचं भवितव्य हे सध्य तटस्थ असलेल्या बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आणि तेलंगाणा राष्ट्र समिती या तीन पक्षांच्या हातात आहे. हे तीन पक्ष ज्या उमेदवाराच्या पारड्यात आपली मतं टाकतील तो उमेदवार राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे आता या पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी या तिन्ही पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीला इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये लोकसभा, राज्यसभा तसेच विधानसभांचे सदस्य मतदान करतात. राज्यसभेच्या २३३, लोकसभेच्या ५४३ आणि सर्व राज्यांच्या विधानसभांचे मिळून ४१२० सदस्य आहेत. त्यांची एकूण संख्या ४८९६ एवढी होते. आमदार आणि खासदारांच्या मतांचं मूल्य हे वेगवेगळं असतं. राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदारंच्या मतांचं एकूण मूल्य हे १० लाख ८६ हजार ४३१ एवढं आहे. तसेच विजयासाठी अर्ध्याहून एक अधिक मताची आवश्यका असेल. त्यामुळे ५ लाख ४३ हजार २१६ मतं मिळवणारा उमेदवार विजयी ठरेल.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचं पारडं जड आहे. मात्र भाजपाला इतर पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सध्या भाजपा आणि त्याच्या मित्रांकडे ४८ टक्के मतं आहेत. एकूण १० लाख ८६ हजार मतांपैकी भाजपाकडे ५ लाख २६ हजार मतं आहेत. तर बहुमताचा आकडा ५ लाख ४३ हजार एवढा आहे. दरम्यान सर्व विरोधी पक्षांकडे मिळून ५१ टक्के मतं आहेत. त्यामुळे सर्व विरोधा पक्षांच्या मतांची गोळाबेरीज केली तर ती एनडीएपेक्षा २ ते ३ टक्के अधिक आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात टीआरएस, बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरेल.
२०१७ मध्ये या तिन्ही पक्षांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी टीआरएस विरोधी पक्षांची आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात असल्याने ते भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. तर बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसने आपले पत्ते अजून खुले केलेले नाहीत.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी एनडीएला सुमारे १३ हजार मतांची गरज आहे. जर वायएसआर काँग्रेस आणि बीजेडीने पाठिंबा दिला तर एनडीएच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा होईल. काही दिवसांपूर्वी वाएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मोदींची भेट घेतली होती. मात्र त्यात नेमकी काय चर्चा झाली हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
नवीन पटनाईक, जगनमोहन रेड्डी आणि केसीआर यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेसविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात केसीआर हे ममतांच्या बाजूने जाण्याची शक्यता दिसत आहे. मात्र बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.