भाजपाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील आपल्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. भाजपानेबिहार विधान परिषदेतील सदस्य सम्राट चौधरी यांची बिहारच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे, तर चित्तौडगड येथील खासदार चंद्रप्रकाश जोशी यांची राज्यस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.
पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी पत्रक प्रसिद्ध करून या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यानुसार दिल्ली भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर ओदिशामधील माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मनमोहन सामल यांची ओदिशाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सिंह यांनी सांगितले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या नियुक्त्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू होणार आहेत. कुशवाहा समाजातून येणारे सम्राट चौधरी हे बिहारमधील दिग्गज नेते राहिलेल्या शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत. शकुनी चौधरी हे सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सम्राट चौधरी बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून संजय जायसवाल यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
तर भाजपाचे राजस्थानमधील नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रप्रकाश जोशी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. ते दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले होते. ते सतीश पूनिया यांच्याकडून पदभार स्वीकारतील. दिल्लीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची गतवर्षी दिल्लीतील भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर ओदिशाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल हे मोहंती यांची जागा घेतील.