कठुआ : जम्मू-काश्मीर मधील उधमपूर मतदारसंघातील तीन प्रमुख उमेदवार काेट्यधीश आहेत. त्यांनी लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्या. त्यावेळी सादर केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती मिळाली. याठिकाणी १९ एप्रिल राेजी मतदान हाेणार आहे.
काॅंग्रेसचे उमेदवार चाैधरी लाल सिंह आणि त्यांची पत्नी माजी आमदार कांता अनडाेत्रा यांच्याकडे १.७९ आणि १.७६ काेटी रुपयांची संपत्ती आहे. २००९ च्या लाेकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडे अनुक्रमे ७.२७ लाख आणि १०.६२ लाख रुपयांची संपत्ती हाेती. लाल सिंह यांनी नुकताच काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे ७ काेटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. त्यांची पत्नी मंजू यांच्याकडे १.५४ काेटी रुपयांची संपत्ती आहे.
जितेंद्र सिंह हे या मतदारसंघातून गेल्या दाेन निवडणुकीत विजयी झाले आहेत. गुलाम नबी आझाद यांच्या डेमाेक्रॅटिक प्राेग्रेसिव्ह आझाद पार्टीचे उमेदवार जी.एम. सरुरी यांच्याकडे ९६ लाख रुपयांची मालमत्ता असून १.११ लाख रुपयांची राेख आहे. त्यांच्या पत्नीकडे एकूण १.१२ काेटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. त्यात ५०० ग्रॅम साेन्याच्या दागिन्यांचा ही समावेश आहे.