बलिया: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल दिवसभरात देशात ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणं गरजेचं आहे. मात्र अनेकांच्या मनात लसीकरणाबद्दल गैरसमज आहेत. त्यामुळे काहींनी अद्यापही लस घेतलेली नाही. लसीकरण करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी पोहोचताच काही जण पळ काढतात, तर काही जण थेट त्या कर्मचाऱ्यांना भिडतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातल्या बलियामध्ये घडला आहे.
बलिया जिल्ह्यात घडलेल्या दोन घटनांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लसीकरण टाळण्यासाठी कोणी झाडावर चढतंय, तर कोणी आरोग्य कर्मचाऱ्याला भिडतंय, असे प्रकार बलियामध्ये घडले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण गरजेचं असल्याचं आरोग्य कर्मचारी स्थानिकांना समजावून सांगत होते. शरयू तटावर असलेल्या नावाड्यांना त्यांनी लस घेण्याचं आवाहन केलं. त्यावेळी एका नावाड्यानं आरोग्य कर्मचाऱ्याला जमिनीवर पाडलं. त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
लसीकरण करणाऱ्या पथकानं नावाड्याला लस घेण्यासाठी बोलावलं होतं. मात्र नावाड्यानं लस घेण्यास नकार दिला. त्यानंतरही कर्मचारी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे नावाडी नाराज झाला. त्यानं कर्मचाऱ्यांशी वाद घातला. एका कर्मचाऱ्याला त्यानं जमिनीवर पाडलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लसीकरण टाळण्यासाठी हडियाकला गावातला एक तरुण थेट झाडावर चढला. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला खाली उतरण्याचं आवाहन केलं. जवळपास अर्धा तास कर्मचारी त्याला खाली येण्यास सांगत होते. अर्ध्या तासानं तरुण खाली उतरला. त्यानंतर त्याला लस टोचण्यात आली.