नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक पोलीस हनीट्रॅपचा बळी ठरला आहे. पीडित पोलिसाने सांगितले की, अश्लील व्हिडीओ कॉल आल्यानंतर आरोपीने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी केली. वारंवार फोन केल्याने व्यथित झालेल्या पोलिसाने शहागंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. खरं तर एक महिन्यापूर्वी संबंधित पोलिसाला व्हिडीओ कॉल आला होता ज्यामध्ये अश्लील व्हिडीओ दाखवण्यात आली होती.
दरम्यान, अनोळखी व्यक्ती असल्याचे समजताच पोलिसाने कॉल कट केला. पण वारंवार फोन येऊ लागले आणि अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवण्यात आले. याबाबात पोलीस लाईनचे हेड कॉन्स्टेबल हरिराम शर्मा यांनी सांगितले, त्यांना अनेकवेळा वेगवेगळ्या फोनवरून फोन आले आणि त्यांच्याकडून 10 हजार रूपयांची मागणी केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन आला आणि त्याने दिल्ली पोलिसांत आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच तुला अटक करण्यासाठी टीम येत असल्याचे नकली अधिकाऱ्याने पोलिसाला सांगितले. तसेच तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर 25,000 रुपये तात्काळ जमा करा. मग पीडित हरिराम शर्मा यांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी ही रक्कम जमा केली.
IPS बनून पोलीस हवालदाराला लुटले बनावट आयपीएसने पुन्हा फोन करून मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले. तिने सुसाईड नोटमध्ये तीन जणांची नावे लिहिली असून त्यापैकी एक नाव तुझे आहे. अटक टाळण्यासाठी हरिराम या पोलीस हवालदाराने पुन्हा आपल्या खात्यातील 50 हजार रुपये दिले. यानंतरही ब्लॅकमेलिंगची मालिका सुरूच राहिली. याला कंटाळून हरिराम शर्मा या पोलिसाने या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. शहागंज पोलीस ठाण्यात मोबाईल क्रमांकाच्या आधारे अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आता त्या संबंधित आरोपीचा अधिक तपास करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"