UP Crime : गेल्या काही वर्षांपासून देशभरात अंमलबजावणी संचलनायचाच्या म्हणजेच ईडीच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधककांडून सत्ताधारी ईडीला कारवाई करण्यासाठी भाग पाडत असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच उत्तर प्रदेशच्या मुथरामधून ईडी कारवाईची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मथुरेत एका सराफा व्यापाऱ्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. मात्र या कारवाईनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरातून पळ काढल्याची बाब समोर आली आहे. हा सगळा प्रकार व्यापाऱ्याच्या घरी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे ईडीचे अधिकारी असल्याचे दाखवून चार चोरट्यांनी दरोडा टाकण्याची योजना आखल्याचे समोर आलं आहे. हे बनावट अधिकारी एका सराफा व्यावसायिकाच्या घरात घुसले होते. ईडीचे अधिकारी आल्यामुळे सुरुवातीला व्यापारीही घाबरला होता. पण त्यांच्या वर्तणुकीवरुन काहीतरी गडबड असल्याचे त्याच्या लक्षात आले. व्यापाऱ्याने आरडाओरड करुन शेजाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर घाबरून बनावट ईडी अधिकारी व्यावसायिकाला सोडून पळून गेले.
मथुरेतील गोविंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसानी लिंक रोड येथील राधा ऑर्किड कॉलनीत हा सगळा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळी तीन पुरुष आणि एक महिला अधिकारी व्यापाऱ्याच्या घरी आले होते. त्यापैकी एक जण पोलिसांच्या गणवेशात होता. हे सर्वजण सराफा व्यापारी अश्वनी अग्रवाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी ईडीचे अधिकारी असल्याची ओळख करून दिली आणि अश्वनी अग्रवाल यांना सर्च वॉरंटही दाखवले.
अग्रवाल यांनी जेव्हा या अधिकाऱ्यांसोबत बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांना संशय येऊ लागला. त्यामुळे त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला विचारले, तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यातून आला आहात? यावर त्याने तो मथुरेच्या गोविंदपुरम पोलीस ठाण्यामधून आलो आहे, असं सांगितले. इथे अग्रवाल यांचा संशय आणखी बळावला. कारण मथुरामध्ये गोविंदपुरम नावाचे पोलीस ठाणेच अस्तित्वात नाही.
त्यानंतर अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांची नजर चुकून घराबाहेर पळ काढला. त्यांनी घरासमोर राहणारे महापौर विनोद अग्रवाल यांचे घर गाठले आणि दरवाजा ठोठावला. यानंतर अग्रवाल यांनी इतर शेजाऱ्यांनाही हाक मारली आणि बाहेर आल्यावर त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती लोकांना दिली. यानंतर लोक त्यांच्या घराकडे जाऊ लागले. त्यानंतर लोकांची गर्दी वाढत असल्याचे पाहून सर्व बनावट अधिकारी घटनास्थळावरून पळून गेले.
यानंतर व्यापारी अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांनी दिलेले ईडीचे वॉरंट त्यांच्या ओळखीच्या एका अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्याला पाठवले तेव्हा त्याने ते खोटे असल्याचे म्हटले. तसेच ईडी कार्यालयातून एकही पथक तेथे पाठवण्यात आले नसल्याची माहिती दिली.