वायनाडमध्ये ‘माळीण’; मुसळधार पावसामुळे चार गावांवर कोसळल्या मृत्यूच्या दरडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 06:18 AM2024-07-31T06:18:35+5:302024-07-31T06:20:21+5:30

दरड कोसळणे व पुराचा सर्वाधिक फटका मुंडक्काई, चूरलमाला, अट्टमाला आणि नूलपुझा या चार गावांना बसला.

in wayanad due to heavy rain landslide on four villages | वायनाडमध्ये ‘माळीण’; मुसळधार पावसामुळे चार गावांवर कोसळल्या मृत्यूच्या दरडी

वायनाडमध्ये ‘माळीण’; मुसळधार पावसामुळे चार गावांवर कोसळल्या मृत्यूच्या दरडी

वायनाड: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटनेला ज्या दिवशी दहा वर्षे पूर्ण झाली, त्याच दिवशी तश्शीच मोठी दुर्घटना केरळमधीलवायनाड येथे घडल्याची बातमी भल्या सकाळी धडकली. वायनाडमध्ये मुसळधार पावसाच्या तडाख्याने मंगळवारी पहाटे दरडी कोसळून त्याखाली दबून १२३ जणांचा मृत्यू झाला, तर १२८ लोक जखमी झाले. शेकडो लोक अद्याप ढिगाऱ्याखाली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

दरड कोसळणे व पुराचा सर्वाधिक फटका मुंडक्काई, चूरलमाला, अट्टमाला आणि नूलपुझा या चार गावांना बसला. अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचावकार्यात लष्कर, नौदल, एनडीआरएफ, राज्याचे आपत्ती निवारण दल, पोलिस, अग्निशमन दलाचे जवान सहभागी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील विरोधी पक्षनेते व वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.

जीव वाचविण्यासाठी खडकाला धरून आकांत

दरडी कोसळल्या त्या परिसरात एक व्यक्ती पाण्यात एका खडकाला धरून जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होती. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, स्थानिक रहिवासी त्याच्या मदतीसाठी फारसे काही करू शकत नव्हते. त्यांनी या माणसाच्या बचावासाठी अधिकाऱ्यांना विनवणी केली. बचाव पथकाने तातडीने हालचाली करून त्याचा जीव वाचविला. 

दरडीखाली दबलेल्या घरांतील लोकांचे मदतीसाठी फोन... 

दरडीखाली दबल्या गेलेल्या घरांतील लोकांनी मदतीसाठी आपत्ती निवारण कक्षाला दूरध्वनी केले. त्यातूनदेखील या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता लक्षात आली. ढिगाऱ्यातून बाहेर पडता येत नसल्याने अनेकांनी सुटकेसाठी आकांत केला. मोबाइलवर बोलताना या गोष्टी ऐकायला येत होत्या.

राहुल, प्रियांका गांधी यांच्या दौऱ्याला वातावरणाचा खाेडा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या वायनाड येथील दरड दुर्घटनाग्रस्त भागाचा बुधवारी सकाळी दौरा करणार हाेते. मात्र, मुसळधार पावसामुळे आपले विमान लॅंड हाेऊ शकणार नाही, असे प्रशासनाने आपल्याला कळवल्याचे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


 

Web Title: in wayanad due to heavy rain landslide on four villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.