सिलिगुडी (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसची जुलमी राजवट मुळापासून उपटून टाकून लोकशाहीची पुनर्स्थापना केली जाईपर्यंत भाजप विश्रांती घेणार नाही, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. गुरुवारी येथे जाहीर सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, भाजपचा लढा हा खंडणी, भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचाराविरोधात सतत सुरूच राहील. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याबद्दल (सीएए) तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत असून, एकदा का कोविड-१९ महामारी संपली की, सीएएची अंमलबजावणी केली जाईल. शाह हे पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या पाठिंब्याशिवाय घुसखोरी आणि तस्करीला थांबविणे कठीण आहे, असे शाह कोलकात्यात म्हणाले. लवकरच अशी राजकीय परिस्थिती निर्माण होईल, की स्थानिक अधिकाऱ्यांना राजकीय दबाबामुळे मदतीचा हात पुढे करणे भाग पडेल, असे सांगून शाह म्हणाले, “सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमा या अभेद्य राहतील, असे बघावे. सीमांचे संरक्षण करणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. परंतु, स्थानिक प्रशासनाच्या पाठिंब्याशिवाय घुसखोरी आणि तस्करी थांबविणे कठीण आहे.”
तीन आठवड्यांत ७ राज्यांचा दौरा
- अमित शाह हे येत्या तीन आठवड्यांत सात राज्यांचा (आसाम, तेलंगणा, केरळ, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात) दौरा करणार आहेत.
- हा दौरा त्यांच्या देशव्यापी दौऱ्यांचा भाग आहे. या दौऱ्यात ते सार्वजनिक, राजकीय आणि सरकारी कार्यक्रमांना उपस्थित राहतील, असे गुरुवारी अधिकाऱ्याने म्हटले.