पणजी - ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा उद्या सोमवारी उघडणार आहे. दोनापॉल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सायंकाळी होणा-या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते उद्घाटन होईल. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांची खास उपस्थिती असेल. उद्घाटनानंतर सायंकाळी ७ वाजता इराणमधील निर्माता मजिद मजिदी याचा ‘बियाँड दि क्लाऊड्स’ हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. दहा दिवसांच्या काळात एूकण ८२ देशांचे १९५ चित्रपट इफ्फीत दाखवले जाणार आहेत.
आंतरराष्टÑीय विभाग व इंडियन पॅनोरमा या इफ्फीतील विभागांमध्ये यावर्षी गाजलेले आणि अफलातून चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार असून त्यात ६८ भारतीय चित्रपटांचे ‘प्रीमियर’ असतील. ‘बियाँड दि क्लाऊड्स’ ला लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. इफ्फीचे यावर्षीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दाखविण्यात येणाºया एकूण चित्रपटांची माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. जागतिक चित्रपटांच्या विभागात आॅस्करसाठी पाठविलेल्या २८ चित्रपटांचा समावेश असेल. एकूण १0 जागतिक प्रिमियर, १0 आशियाई चित्रपट प्रिमियर होतील काही हिंदी चित्रपटांचेही प्रिमियर होणार आहेत. इंडियन पॅनोरमा विभागात यंदा नऊ चित्रपट दाखवले जातील.आॅस्करसाठी भारतातून नामांकन मिळविलेला ‘न्युटन’ हा सिनेमाही प्रदर्शित केला जाणार आहे.
कॅनडियन सिने दिग्दर्शक अॅटॉम इगोनॉय यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. १५ चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले असून अनेक टीव्ही मालिका त्यांच्या नाववर आहेत. ‘नेक्स्ट आॅफ कीन’ या त्यांच्या चित्रपटास मानहेम, हिदेलबर्ग येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृ ष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.
यंदाच्या इफ्फीत बॉलिवूड सुपरस्टर अमिताभ बच्चन यांना ‘पर्सनॅलिटी आॅफ द इयर’ पुरस्कार यांना दिला जाणार आहे. बच्चन यांची चित्रपट कारकीर्द जवळपास अर्धशतकाची असून, त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अमिताभ स्वत: तसेच संपूर्ण बच्चन कुटुंबिय समारोपाच्या सोहळ्यास खास उपस्थिती लावणार आहे.
सिने जगताशी संबंधित देश, विदेशीतील सुमारे ७ हजार प्रतिनिधींनी इफ्फीसाठी नोंदणी केली आहे. सिने कलाकार, तंत्रज्ञ यांची मोठी उपस्थिती यंदाच्या इफ्फीला लाभणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.