- बलवंत तक्षकचंडीगड : पंजाबमध्ये ७५ मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्याच्या विविध जिल्ह्यांतील या आम आदमी क्लिनिकचे स्वातंत्र्यदिनी लोकार्पण केले. या क्लिनिकमध्ये रुग्णांवर नि:शुल्क उपचार होतील.
राज्याच्या प्रत्येक गावांत व शहरांत असे क्लिनिक उघडण्यात येणार आहेत. जास्त लोकसंख्येच्या गावांत दोन-दोन क्लिनिक सुरू करण्याची योजना आहे. या क्लिनिकमध्ये ऑनलाईन अपाॅईटमेंटची सुविधादेखील उपलब्ध असेल, असे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले. प्रत्येक क्लिनीकमध्ये डॉक्टर, औषध निर्माण अधिकारी व नर्ससह चार ते पाच जणांचा कर्मचारी वृंद असेल. मोहल्ला क्लिनिक स्थापन करून आप सरकारने निवडणूकीतील आश्वासन पूर्ण केले आहे. या क्लिनिकमध्ये सामान्य रुग्णांवर उपचार केले जातील तर गंभीर आजार असलेल्यांना रुग्णालयांत रेफर केले जाईल, असे मान म्हणाले.
मोहल्ला क्लिनिकची कार्यपद्धती तपासण्यासाठी मान यांनी स्वत: एका मोहल्ला क्लिनिकमध्ये आपला रक्तदाब तपासला. या क्लिनिकमध्ये १०० प्रकारच्या तपासण्या आणि आरोग्यविषयक ४१ पॅकेज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.