संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अयोध्येतील राममंदिराचे लोकार्पणही आता पूर्वनियोजित वेळेआधी म्हणजे यावर्षी दिवाळीच्या सुमारास नाेव्हेंबरमध्ये होणार आहे. नवीन संसद भवनाचा शुभारंभही याच वर्षी जुलैमध्ये होणार असून, पुढील पावसाळी अधिवेशन नव्या इमारतीत होणार आहे.
नरेंद्र माेदींना सर्व प्रकल्प लवकर पूर्ण करायचे आहेत. त्याच मुद्द्यांवर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका भाजप लढवू इच्छित आहेत. याचमुळे अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राममंदिराची लोकार्पणाची तारीखही अलीकडे आणण्यात आली आहे. आता नवीन तारीख दिवाळीच्या आसपास निश्चित केली जात आहे.
गृहमंत्री शाह यांनी दिली हाेती ‘ही’ तारीख
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर्षी जानेवारीमध्ये सांगितले होते की, अयोध्येतील राममंदिर १ जानेवारी २०२४ पर्यंत तयार होईल व २०२४ च्या मकर संक्रांतीपर्यंत राममंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. आता ते दोन महिने आधीच खुले होणार आहे.
नवीन संसद भवनही उद्घाटनासाठी तयार
नवीन संसद भवनाची इमारतही तयार झाली असून, उरलेली छोटी-मोठी कामेही झाली आहेत. स्वत: मोदी यांनी नुकतेच नवीन इमारतीचे निरीक्षण केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवीन संसदेचा शुभारंभ करतील.